केळी पीक विमा मिळण्यासाठी सुलवाडी भागातील शेतकरी आक्रमक, लोकप्रतिनिधींना गावबंदी आणि मतदानावर बहीष्कार
केळी पीक विमा मिळण्यासाठी सुलवाडी भागातील शेतकरी आक्रमक, लोकप्रतिनिधींना गावबंदी आणि मतदानावर बहीष्कार
रावेर दि. 8 ( मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क )
तालुका भरात बऱ्याच गावांमध्ये लोकप्रतिनिधींना केळी पिक विम्याच्या संदर्भात गाव बंदी करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर सुलवाड़ी येथील शेतकऱ्यांनी सोमवार दि.8 रोजी एकत्र येत आक्रोश समिती स्थापन केली असून व त्यात सर्वानुमते असे ठरविले आहे की जोपर्यंत पीक विम्याची सन २०२२-२३ मधील रक्कम मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्ष्याच्या नेत्यांना गावबंदी असणार आहे.
जळगांव जिल्हा हा सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात रावेर तालुक्यात सर्वाधिक केळीची लागवड होत असून येथील केळी देशात नव्हे परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यात तालुक्यातील केळी बेल्ट म्हणून तांदलवाडी, बलवाडी,खिर्डी,ऐनपूर,निंबोल, कोळदा , सुलवाडी भाग सर्व ज्ञात आहे.असे असतांना प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२-२३ मधील रक्कम आज मुदत संपून चार महिने होऊन सुध्दा शेतकऱ्यांना मिळालेली प्रत्यक्ष शेतात केळी असतांना ते प्रकरण पेंडिंग फॉर अप्रुवल किंवा रिजेक्ट असें दिसते.विमा काढतांना कंपनीच्या अटी प्रमाणे केळीचे टॅगगिंग फोटो,प्रीमियम, तसेच सात बारा उताऱ्यावर त्या साली केळी असल्याची नोंद असणे आवश्यक असते तरच विमा निघू शकतो मग तेव्हा सर्व कागदपत्रे योग्य असल्यावर आज ती प्रकरणे रद्द कशी असा कडा सवाल अन्यायग्रस्त शेतकरी करीत आहे. वारंवार अर्ज देऊन,कृषी खात्याला तक्रार करून,जिल्हाधिकारी कडे मिटिंग घेऊन म्हणा का सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटून सुद्धा काहीच फायदा होत नसल्याने हे टोकाचे पाऊल ग्रामस्थांनी सोमवार सकाळी सुलवाड़ी येथे एकत्र येत उचलले आहे. शेतकरी त्रस्त असल्याने आज ही वेळ आली आहे म्हणून गावात येणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंना फलक लावणार असून जो पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पुढारी,नेते,आमदार,खासदार यांना गावबंदी असणार आहे तसेच पुढील निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार .टाकण्यात येऊन मतदान सुद्धा करणार नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
तसेच येत्या १० दिवसात जर पिक विमा मिळाला नाही तर जल समाधी आंदोलन घेण्याचा ठराव सुद्धा करण्यात आला आहे यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .