व्हॉईस ऑफ मीडिया'च्या आंदोलनाला मोठे यश
पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनानंतर शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची, माहिती महासंचालक यांची भेट
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क
'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या वतीने पत्रकारांच्या राज्यभर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त पत्रकार त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. याच आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले होते. पत्रकारांच्या बेसिक असणाऱ्या मागण्या या तातडीने मान्य करू, असा विश्वास या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आंदोलन झाल्यावर लगेच त्या आंदोलनाची दखल घेतली जाते हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडले. 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या समवेत राज्यातल्या पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पत्रकारितेची दहा वर्षे पूर्ण केल्यावर जो मागेल त्याला अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, अधिस्वीकृती कार्डसह, पत्रकार सन्मान योजना, पत्रकारांसाठी महामंडळ, अनेक प्रलंबित असणारे जीआर, वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिराती संदर्भातल्या अडचणी, असे अनेक विषय या मागण्यांमध्ये होते. त्यासाठीच राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आले होते. राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये साडेतीन हजार पत्रकारांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदने दिली. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. प्रशासनाच्या समोर धरणे आंदोलन करताना निषेध नोंदवला, या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या शिष्टमंडळाला आज भेटीसाठी बोलवले होते. त्या सगळ्या मागण्या श्री. शिंदे यांनी समजून घेतल्या. या मागण्यांसंदर्भामध्ये तातडीने बैठक बोलवून त्या मागण्या सोडवण्यात येतील, असे आश्वासनही शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातल्या पत्रकारांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. आम्ही वेळोवेळी पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात विचार केलेला आहे. पत्रकारांचे भविष्य आणि आयुष्य दोन्हीही सुखकर कसे होईल यासाठी अनेक वेगवेगळ्या योजनांसंदर्भातही आम्ही विचारविनिमय करू लागलो आहोत. 'व्हॉईस ऑफ मीडिया'ने राज्यभर जे आंदोलन उभे केले होते त्या सगळ्या आंदोलन करणाऱ्या पत्रकारांना मला हेच सांगायचे आहे की, आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे.
'व्हॉईस ऑफ मीडिया'चे मुंबई अध्यक्ष सुरेश ठमके आणि मुंबई विभागातील पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळामध्ये या आंदोलनाची तीव्रता, मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे सांगितले. यावेळी सुरेश ठमके म्हणाले, आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सकारात्मकपणे या आंदोलनामध्ये जे जे विषय आले ते आम्ही हाताळू आणि न्याय देऊ, असे आश्वासन आम्हा सगळ्यांना दिले.
मंत्रालयात राज्याच्या माहिती महासंचालक जयश्री भोज यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भेट घेतली. मागणी आणि आंदोलनाच्या निमित्ताने असणाऱ्या समस्या माझ्यापुढे आल्या आहेत, त्या समस्या मी तातडीने सोडवतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबईचे अध्यक्ष सुरेश ठमके, केंद्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, केंद्रीय सचिव दिव्या भोसले,‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्य सेलचे प्रमुख भिमेश मुतुला, यांची यावेळी उपस्थिती होती.
'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सातत्याने मार्गी लागतात, तसे या आंदोलनाच्या निमित्तानेही झाले. 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे राज्यभरातल्या सगळ्या पत्रकारांनी आभार मानले आहे