रावेर तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांचा केळी पिक विमा वांध्यात
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांचा केळी पिक विमा वांध्यात सापडल्याने या संदर्भात तहसीलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या केळी पिकाच्या नुकसानीपासून बचावासाठी विमा कवच घेणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांपुढे बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे नव्याने संकट उभे राहिले आहे.
रावेर येथील आयसीआयसीआय व एचडीएफसी या बँकांचा केळी विम्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयसीआयसीआय बँकेने खातेदार केळी उत्पादकांकडून विमा हप्ता घेतला होता, मात्र बँकेने सदरील हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न करता, तो पुन्हा शेतकर्यांच्या खात्यात जमा केल्याने शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर एचडीएफसी बँकेने देखील शेतकऱ्यांकडून विमा हप्ता घेतला आहे. मात्र विमा कंपनीच्या पोर्टलवर सबंधित शेतकऱ्याची नावे दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. या संदर्भात बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार बी.ए. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीस तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँकांचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, शेतकरी अमोल गणेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते