ब्रेकींग : तरुणाचा संशयास्पद मृत्यू!; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या आंदोलन !

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- विवरा खुर्द येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू! झाल्याची घटना काल उघडकीस आली

Dec 18, 2025 - 08:50
 0
ब्रेकींग : तरुणाचा  संशयास्पद मृत्यू!; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या आंदोलन !

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर । रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २१ वर्षीय हितेश सुनील पाटील या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हितेशच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेहासह दोन तास ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणारा हितेश हा गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होता. कोणालाही काहीही न सांगता तो घराबाहेर पडला होता. रविवारी १४ डिसेंबर रोजी त्याची दुचाकी भुसावळ येथील तापी पुलावर बेवारस अवस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची नोंदही करण्यात आली होती. मात्र, बुधवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक मच्छीमारांना नदीत त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला त्यामुळे तात्काळ पोलिसांना बोलवून चौकशी करण्यात आली

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. मात्र, नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून 'घातपात' असल्याचा खळबळजनक आरोप केला. "हितेशची हत्या करण्यात आली आहे, जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधारांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही," अशी आक्रमक भूमिका नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घेतली. संतप्त ग्रामस्थांनी निंभोरा पोलीस ठाण्याबाहेर मृतदेह ठेवून सुमारे दोन तास ठिय्या दिला.

 सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. सुमारे दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आला. विवरा खुर्द येथे शोकाकुल वातावरणात रात्री हितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अश्रू अनावर झाले

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील