चिनावलमध्ये धाडसी चोरी करत सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:- रावेर तालुक्यातील चिनावल येथे धाडसी चोरी करत चोरांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास करीत पलायन केले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील चिनावल येथील सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र मुरलीधर सरोदे यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल दोन लाख बारा हजार दोनशे साठ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे
राजेंद्र सरोदे हे भावाच्या निधनानिमित्त खडका येथे गेले होते. दि. 14 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते चिनावल येथे परतले असता घराचा लोखंडी दरवाजा उघडा आणि मुख्य लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तुटलेला अवस्थेत दिसून आला. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून घरात प्रवेश केला असता बेडरूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले याबद्दल पोलिसांना माहिती दिली
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2009 साली विकत घेतलेले 40 ग्रॅमचा राणीहार (₹70,393), 10 ग्रॅमची अंगठी (₹17,567), 8 ग्रॅमची अंगठी (₹14,040), 25 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या (₹44,454), 5 ग्रॅमची अंगठी (₹8,775), 15 ग्रॅम सोन्याचा तुकडा (₹13,600), 28 ग्रॅमचा राणीहार (₹43,437) असा एकूण दोन लाख बारा हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरीस गेला आहे. दरम्यान, सरोदे यांच्या समोरच्या हेमराज सखाराम सरोदे यांच्या बंद घरातही चोरट्यांनी फोडाफोड केली; मात्र ते डोंबिवली येथे वास्तव्यास असल्याने घरात कोणताही ऐवज नसल्याने चोरट्यांना काहीही हस्तगत झाले नाही.
परिसरात दहशतीचे वातावरण
सध्या तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून रात्री सामसूम असल्याने चोरट्यांना संधी मिळत असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीचे गस्त व पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सावदा पोलिसांना माहिती मिळतात घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून फिर्यादी शिक्षकांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305(A), 331(3), 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल सानप व हवालदार विनोद तडवी करीत आहेत.