रावेर जवळ दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क :- रावेरजवळ भीषण अपघात दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
रावेर - मुक्ताई न्यूज नेटवर्क ।
रावेर शहराजवळ 4 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी झालेल्या मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या हृदयद्रावक घटनेमुळे रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे
रावेर शहरा बाहेरील सावदा रोडवर बिजासनी माता मंदिरा पासून काही अंतरावर बुधवार 4 फेब्रुवारी रोजी दुपारी मोटर सायकलच्या समोरासमोर भीषण अपघात घडला.
या अपघातात विनय भालेराव (वय २६) हा आपल्या मोटरसायकलवरून रावेरच्या दिशेने येत होता, तर शुभम लोखंडे (वय २०) हा रावेरहून विवरकडे जात असताना दोघांच्या मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनय भालेराव याला तातडीने उपचारासाठी रावेर येथील खाजगी रुग्णालयात व नंतर भुसावळ येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना रस्त्यात त्याचा देखील मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रावेर तालुक्यात वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून, या अपघाताची तालुकाभर चर्चा होत आहे. नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन आणि वेगावर नियंत्रण याकडे पालकांसह पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असून भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहकांवर योग्य ती कारवाई करून अशा दुर्देवी घटना काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे