शिंगाडीच्या जीवन चौधरीची अमेरिकेतील 'डब्ल्यूडब्ल्यूडीसी स्विफ्ट विद्यार्थी स्पर्धा २०२५' मध्ये निवड; निंभोरा पोलिसांकडून सत्कार
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- शिंगाडीच्या जीवन चौधरीची 'डब्ल्यूडब्ल्यूडीसी स्विफ्ट विद्यार्थी स्पर्धा २०२५' मध्ये निवड; अमेरिकेच्या दौऱ्यासाठी अॅपल कंपनीकडून संपूर्ण प्रायोजित आमंत्रण करण्यात आले आहे त्यामुळे निंभोरा पोलिसां तर्फे सत्कार करण्यात आला.

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-
रावेर तालुक्यातील शिंगाडी या छोट्याशा ग्रामीण गावातील जीवन रामकृष्ण चौधरी याने जागतिक पातळीवरील ‘डब्ल्यूडब्ल्यूडीसी स्विफ्ट विद्यार्थी स्पर्धा २०२५’ या स्पर्धेमध्ये विशेष विजेता म्हणून स्थान पटकावले असून, तो जगातील ५० निवडक विद्यार्थ्यांमध्ये झळकला आहे. अॅपल कंपनीतर्फे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत निवड होणे हे भारतासाठी गौरवाची बाब ठरली आहे. जीवनची ही कामगिरी देशातील उदयोन्मुख डिजिटल प्रतिभेचे प्रतीक मानली जात आहे.
जीवनला कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे होणाऱ्या अॅपल जागतिक विकसक परिषदेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले असून, त्याचा संपूर्ण प्रवास व वास्तव्याचा खर्च अॅपल कंपनीतर्फे प्रायोजित केला गेला आहे. तो दिनांक ७ जून रोजी अमेरिकेकडे प्रयाण करणार आहे.
जीवनचे वडील, शेतकरी रामकृष्ण चौधरी यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. शिंगडीची सुख-सुविधा त्याग करून, श्रीकृष्ण डेअरी नगझिरी येथे तब्बल २३ वर्षे उद्योग करून मुलांचा उदरनिर्वाह व शिक्षण सुसंगत ठेवले. आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी योग्य संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या संघर्षाचे फळ आज जीवनला मिळाले असून, त्यांच्या त्यागाचे चीज झाल्याचा गर्व संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे.
या यशाच्या निमित्ताने निंभोरा पोलीस ठाण्यात जीवनचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ठाण्याचे प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे,पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे व ज्येष्ठ पत्रकार राजू बोरसे यांच्या हस्ते जीवनला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याचे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना अधिकारी बोचरे साहेब म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्षमता आहे, फक्त योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते जागतिक स्तरावर झळकू शकतात. जीवन चौधरी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे
या यशाने संपूर्ण परिवार आनंदित झाला आहे. जीवनचे आजोबा, कै. भगवात हरि चौधरी यांचा त्याच्या घडण्यात मोठा वाटा होता. आज ते हयात नसले तरी त्यांची स्वप्ने पूर्ण होत असल्याचा आनंद सर्वांना आहे. आजी मंजुळाबाई भगवान चौधरी यांनी देखील जीवनच्या या ऐतिहासिक यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. संपूर्ण चौधरी परिवार व ग्रामस्थ मंडळी आणि जळगाव जिल्ह्याने जीवनच्या या जागतिक स्तरावरील यशाचे मनापासून स्वागत केले असून, त्याच्याकडून अधिक उंच भरारीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल मुक्ताई परिवारातर्फे त्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा