पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या वादातून गळा आवळून पतीची आत्या
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:- पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या वादातून पतीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे रावेर पोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर – रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात शेतात आढळलेल्या ३० वर्षीय मजुराच्या मृत्यूचे गूढ रावेर पोलिसांनी उलगडले असून, अनैतिक संबंधांच्या वादातून दोन मित्रांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०) ऐनपुर हा ९ जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होता. ११ जुलै रोजी सकाळी विनायक पाटील नांदूरखेडा यांच्या गट नंबर 96 शिवारातील कपाशीच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाची दिशा बदलली.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा राग मनात धरून त्याने मयताला “तू आमच्या संबंधांमध्ये आला तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
९ जुलैच्या रात्री गणेश घोरपडे व मेघराज वसंत सांगळे यांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून दोघे पसार झाले, असा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.
मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणात मेघराज वसंत सांगळे याला अटक करण्यात आली असून मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याला सागवानी तहसील -जयशिनगर जिल्हा सागर मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील व पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील सुरू असून, रावेर पोलिसांनी तात्काळ तपास करून खुनाचे गूढ उकलल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.