तरुणाचा ट्रॅक्टर वरून तोल गेल्याने रोटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू, परिसरात शोककळा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:- 18 जूनला लग्न असलेल्या भावी नवरदेवाचा तोल गेल्याने ट्रॅक्टर रोटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरले आहे

May 24, 2026 - 11:19
May 24, 2026 - 11:25
 0
तरुणाचा ट्रॅक्टर वरून तोल गेल्याने रोटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू, परिसरात शोककळा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-

यावल तालुक्यातील मोहराळा शिवारात शनिवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात दहिगाव येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी योगेश यशवंत पाटील यांचा रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, येत्या १८ जून रोजी त्यांचा विवाह होणार होता. लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे शनिवारी मोहराळा शिवारातील शोभराज महाजन यांच्या शेतात स्वतःच्या ट्रॅक्टरने रोटर करण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर चालवत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते ट्रॅक्टरवरून खाली पडले. काही क्षणांतच ते सुरू असलेल्या रोटरमध्ये सापडल्याने गंभीर जखमी झाले.

योगेश पाटील हे ट्रॅक्टर खाली पडल्यानंतर व अपघातानंतरही ट्रॅक्टर सुरूच राहिल्याने ते सरळ समोरच्या शेतात जाऊन पोहोचले. ही धक्कादायक घटना जवळच निंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने पाहिली. त्याने तातडीने धाव घेत ट्रॅक्टर बंद केले आणि योगेश पाटील यांच्या वडिलांना घटनेची माहिती दिली.

यानंतर योगेश पाटील यांचे वडील व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. यावेळी त्यांच्या वडिलांना व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले

मृत योगेश पाटील हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न आणि त्याआधीच झालेला हा दुर्दैवी मृत्यू यामुळे दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजेंद्र पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडे आणि राजेंद्र पवार करत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील